मुंबई : सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेले नगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर त्याची सर्वाधिक चर्चा झाली. मात्र ५ वर्षांपूर्वीच्या घटनेवर निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तत्कालिन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीच आम्हाला काँग्रेस पक्षाच्या बाहेर काढले, असा दावा राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दबदबा निर्माण केलेले विखे कुटुंब. विखेंची चौथी पिडी राजकारणात सक्रीय असून यंदा सुजय विखे यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून धक्कादायकरित्या पराभव झाला. राष्ट्रवादीने निलेश लंके यांना उमेदवारी देऊन नगरच्या राजकारणात रंगत आणली. शरद पवार यांचा करिश्मा आणि निलेश लंके यांच्या वातावरणनिर्मितीमुळे विखेंचा अनपेक्षित पराभव झाला. तत्पूर्वी पाच वर्षांआधी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी न दिल्याने सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बापलेक भारतीय जनता पक्षाकडून लढले. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असताना विखे बाप लेकाने एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या लोकप्रिय कार्यक्रमात काँग्रेस सोडण्याच्या कारणांवर भाष्य केले.
… तर काँग्रेस पक्षात राहायचेच कशाला? असा विचार आम्ही केला
राहुल गांधी यांनी सुजयला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढायला सांगितले. जर पक्षाचे अध्यक्षच दुसऱ्या पक्षातून लढायला सांगत असतील तर पक्षातच कशाला राहायचे? असा विचार करून आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. किंबहुना आम्ही पक्ष सोडण्याला राहुल गांधी हेच जबाबदार आहेत. त्यांनीच आम्हाला पक्षाबाहेर ढकलले, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, सुजयला राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करा
औरंगाबादची जागा सलग १२ वेळा काँग्रेस पक्ष हरला आहे तर नगर दक्षिणची जागा सलग तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हरला होता. अशावेळी आम्ही जागांची अदलाबदल करण्याची मागणी करीत होतो. याचसंदर्भाने शरद पवार यांना मी दोन चार वेळा जाऊन भेटलो. परंतु जागांची अदलाबदल करण्यासाठी कार्यकर्ते ऐकत नाही, असे त्यांनी मला त्यावेळी सांगितले. मग शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राहुल गांधी यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी सुजयला राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करण्याचे सुचवले. जर राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जर दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी सांगत असेल तर मग त्या पक्षात का राहावे? असा विचार करून आम्ही काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.



