कामशेत : पुणे जिल्हा दूध संघा (कात्रज)चे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा देतानाच त्यांनी आमदार शेळकेंना इशारा दिला, की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, सुडबुद्धीने वागू नका, अन्यथा एक दिवस रसातळाला जाल. आमदार शेळकेंना घरी बसवा, अन्यथा तालुक्याचा ऱ्हास अटळ आहे. त्यामुळे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही नेवाळे यांनी मतदारांना केले.
कामशेत येथील छत्रपती शिवाजी चौकात बाळासाहेब नेवाळे यांनी ‘लढा दडपशाही विरुद्ध’ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, काँग्रेसचे नेते रामदास काकडे, माऊली शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नेवाळे म्हणाले, की गुन्ह्यांशी संबंध नसताना मुद्दाम गोवले जाते, तेव्हा खूप त्रास होतो. माझ्यावर गुन्हे मुद्दामहून दाखल केले. पोलिसांनी योग्य निर्णय घेतला नाही, तर ५ डिसेंबरला धरणे आंदोलन करणार आहे.
ज्यांनी त्रास दिला, त्यांना मत देऊ नका : रामदास काकडे
गुजरात हे आघाडीवर चाललेले राज्य आहे. वर्गिस कुरियन यांच्यामुळे दूध क्रांती झाली. त्यामुळे शेतकरी सुखी व समाधानी झाला. तेच काम गोकुळ, कात्रज दूध संघाने केले आहे. बाळासाहेब नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कात्रज डेअरी व शेतकऱ्यांना बोनस देण्याची सुरुवात केली. त्यांनी अभ्यासपूर्ण काम केले आहे. एवढं काम असूनही नेवाळे यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे ज्यांनी त्रास दिला, त्यांना मत देऊ नका.
मावळात कुठे आहे सहकार ? : माजी मंत्री मदन बाफना
मावळ तालुक्यात ज्या विविध कार्यकारी सोसायटीला स्वतःची इमारत आहे, अशी एकही सोसायटी मावळ तालुक्यात नाही. सहकार जगला तर राज्य जगेल, पण मावळात कुठे आहे सहकार ? गावकऱ्यांनी सोसायट्याकडे लक्ष दिले नाही, तर गावांचे वाटोळं होणार आहे. आपण सुसंस्कारीत राजकारण करणार आहात की पैशाचे ? चुकीच्या पद्धती शिकवणारा हा आमदार शेळके आहे. हा आमदार तालुक्यातील मतदारांमुळे मोठा आहे. आपल्यावर ज्यांनी उपकार केले ते विसरायचे नसतात.
मावळ तालुक्यात विकास वेडा होऊन हरवलाय : गणेश भेगडे
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती आहेत. मात्र, मावळात सर्वपक्षीय विरुद्ध एक अशी लढत का आहे, याचा विचार समोरच्याने केला पाहिजे. तालुक्यात चाललेला कारभार पसंत नाही म्हणून आम्ही एक झालो आहोत. निवडणूक संपली की राजकारण संपले पाहिजे. हे सगळे माझे आहेत हे समजून कामाला लागले असते, तर आज मावळची राजकीय स्थिती स्वच्छ असली असती. सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून मी काहीही करीन ही वृत्ती मावळ तालुका खपवून घेणार नाही. राजकीय दबाव आणून बाळासाहेब नेवाळे यांना तुरुंगात टाकलं. जे आमदार शेळके स्वतः पोलिसांच्या गराड्यात असतात, ते जनतेला काय सुरक्षा देणार आहेत. पिस्तूलांची लायसन्स कशासाठी? तरुणांना व्यसनासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी किती तरुणांना रोजगार दिला हे सांगा.
माता भगिनींनो आपल्या मुलांना सांभाळा : नेवाळे
माता भगिनीना वाटतंय का की आपला मुलगा दारू पिऊन बिघडला नाही पाहिजे, तर आमदार शेळके यांच्याकडे जाण्यापासून आपल्या मुलांना थांबवा.
आमदार शेळके तुम्ही किशोरभाऊंच्या मातेची माफी मागा : नेवाळे
आमदार सुनील शेळके तुम्ही केवळ किशोरभाऊ आवारे आणि बापूसाहेब भेगडे यांच्यामुळे आमदार झाला आहात, हे विसरू नका. किशोर आवरेंच्या मातेकडे माफी मागा. एसआयटी’ची मागणी स्वतःहून करा. ही दानत ठेवा. मावळ तालुका तुम्हाला डोक्यावर घेईल. मावळातील ८० टक्के लोक तुमच्या विरोधात आहेत. केवळ पैशाच्या जोरावर चुकीचे काम करीत आहात. त्यामुळे तालुका चुकीच्या दिशेने चालला आहे. पुणे जिल्ह्यातील २१ आमदारांमध्ये मावळचा विद्यमान आमदार निवडणुकीत सर्वात जास्त खर्च करत आहे. कार्यकर्ता हाच शब्द काढलाय.
कार्यकर्त्यांनो पैशासाठी आमदार शेळके सोबत फिरू नका : नेवाळे
कार्यकर्त्यांना माझे आवाहन आहे, की दोन पैशासाठी आमदार शेळकेंसोबत फिरू नका, आयुष्य बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. ते चुकीच्या मार्गाने पैसे कमवत आहेत. त्यामुळेच निवडणुकीत ते इतका पैसा खर्च करत आहेत. पापाचे पैसे प्रपंचासाठी खर्च करून कुणी सुखी होणार नाही. चार हजार कोटीची कामे केली म्हणता तर पैसे का वाटता ? पैसा घेणाऱ्या कार्यकर्त्यांनो तुम्ही थांबा. भुलाथापांना बळी पडू नका.



