लोणावळा : लोणावळा शहरातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आधार फाउंडेशन आणि सफल फाउंडेशन यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गरजू महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, या संस्थांनी २५ महिलांना गृहउद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री वाटप केली.
हा कार्यक्रम २९ जानेवारी रोजी शेडगे हाइट्स, दत्त मंदिरासमोर संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत महिलांना केवळ मशीनच नव्हे, तर त्यावर उत्पादन कसे तयार करावे याचे प्रशिक्षणही आधार फाउंडेशनच्या भांगरवाडी कार्यालयात दिले जाणार आहे. याशिवाय, या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारीही फाउंडेशनने घेतली आहे.
या उपक्रमामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल बनेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.



