लोणावळा : लोणावळा शहरातील एका महत्त्वाच्या चौकातील टपरीवर एक धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. शाळकरी गणवेशातील एक लहान मुलगा टपरीवर बसून पान बनवत होता आणि ग्राहकांना सिगारेट, तंबाखू, गुटखा यांसारख्या व्यसनसामग्री विकत होता. हा मुलगा कदाचित आपल्या वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या टपरीवर बसला असावा, मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.केवळ काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती, जिथे शाळकरी गणवेशातील मुली एका सार्वजनिक बागेत सिगारेट ओढताना आढळल्या होत्या. या घटनेमुळे आधीच चिंता वाढली असताना आता एक लहान मुलगा थेट तंबाखू विक्री करत असल्याचे आढळणे, हे अधिक गंभीर आहे.
यातून प्रश्न निर्माण होतो की, लोणावळा शहरातील लहान मुले एवढ्या लवकर व्यसनाच्या विळख्यात का आणि कशी अडकत आहेत? आणि जर शाळकरी मुलेच व्यसन विक्री करत असतील, तर त्यांच्यावर देखरेख ठेवणारे पालक आणि स्थानिक प्रशासन याबाबत किती जागरूक आणि जबाबदार आहेत?या प्रकारांवर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अल्पवयीन मुलांना दुकानांमध्ये बसवणे, त्यांच्याकडून व्यसनसामग्री विक्री करवून घेणे हे कायद्यानेही चुकीचे आहे. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहून कारवाई करावी आणि पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे, अशी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून मागणी केली जात आहे.



