लोणावळा – पर्यटकांची पसंदि म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात सध्या वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः जुना मुंबई-पुणे महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, याच मार्गावर वाहनचालक रस्त्यावरच गाड्या पार्क केल्याने कोंडी वाढत चालली आहे.
कुमार चौक ते किरण पेट्रोल पंप या दरम्यानचा परिसर विशेषतः वाहतूक कोंडीसाठी बदनाम झाला आहे. या भागातील काही प्रसिद्ध दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते. मात्र ग्राहक गाड्या थेट महामार्गावर थांबवून खरेदीसाठी जात असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.यामुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या उन्हाळी पर्यटन हंगामात ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.



