मावळ तालुक्यातील कार्ला शेजारी असलेल्या टाकवे खुर्द या लहानशा खेड्यातील पंकज बाळासाहेब पिंपरे याने नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात चार्टर्ड अकौंटंट (CA) ची परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, त्याने हे यश अवघ्या २२ व्या वर्षी मिळवलं आहे.
पंकजची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील व्यवसायाने रिक्षाचालक असून, मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला पंकजने शिक्षणात सातत्य ठेवले. कोविड काळात वडिलांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले. त्यातच बारावीचा निकाल लागल्यानंतर पंकजने CA बनण्याचं ध्येय निश्चित केलं.
Foundation परीक्षेच्या नोंदणीसाठी घरची परिस्थिती नसल्याने त्याच्या भावाची सोन्याची चैन गहाण ठेवावी लागली. मात्र, या कठीण परिस्थितीतही त्याने कोणताही क्लास न करता केवळ २-३ महिन्यांच्या अभ्यासातच डिसेंबर २०२० मध्ये CA Foundation उत्तीर्ण केली.
यानंतर पंकजने दोन्ही ग्रुपमधून CA Intermediate परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत स्वतःचं स्थान निर्माण केलं. पुढे त्याची PWC या ‘बिग 4’ फर्ममध्ये आर्टिकलशिपसाठी निवड झाली. दीड वर्ष PWC मध्ये काम केल्यानंतर Banking & Finance मध्ये स्पेशलायझेशनसाठी त्याने HSBC या आंतरराष्ट्रीय बँकेत अनुभव घेतला.
नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याने CA Final परीक्षा दिली. मात्र परीक्षेआधी काही दिवस त्याच्या आजींची प्रकृती गंभीर झाली आणि परीक्षा सुरू होण्याच्या सातव्या दिवशी त्यांचे निधन झाले. या धक्क्यामुळे त्याला आपल्या आयुष्यातील पहिलं अपयश अनुभवावं लागलं.
मात्र पंकजने हार न मानता पुन्हा जोमाने तयारी केली. शिवरायांच्या पुरंदरच्या तहाचा दाखला डोळ्यांसमोर ठेवत आणि आपल्या मॅनेजरच्या सहकार्याने दीड ते दोन महिन्यांत अभ्यास पूर्ण करून त्याने CA Final यशस्वीरित्या पूर्ण केली.
पंकजचा हा संघर्ष, त्याची चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे. त्याच्या या प्रवासात त्याचे आई-वडील, मित्र, तसेच मार्गदर्शक CA गुरुदेव गरुड आणि CA स्नेहल गरुड यांचे मोलाचे योगदान आहे, असे तो अभिमानाने सांगतो.
पुढे जाऊन गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची इच्छाही तो व्यक्त करतो. पंकजचे यश ही संपूर्ण मावळासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.



