देहूरोड – कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी देहूरोड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने देहूरोड रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी महिलावेशात येत चालत्या रेल्वेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले आणि संभाव्य अनर्थ टाळला.
या वेळी आंदोलकांनी सह्याद्री एक्सप्रेस अथवा पर्यायी रेल्वेला देहूरोड स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. धर्मपाल तंतरपाळे म्हणाले की, “सह्याद्री एक्सप्रेस ही गोरगरीब प्रवाशांसाठी अत्यंत आवश्यक गाडी होती. गेल्या तीन वर्षांपासून देहूरोड स्थानकावर थांबणारी ही गाडी बंद झाल्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.”
रेल्वे प्रशासनाकडे वारंवार निवेदने, आंदोलने व चर्चा करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही टोकाची भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनावेळी रघु गव्हाळे, भाजप नेते सूर्यकांत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते जलाल शेख, अजय बरवारिया, नंदू शेजुळे, सुलतान शेख, सुभाष म्हस्के, अनिल खंडेलवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



