लोणावळा : शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) च्या लोणावळा शहर कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्री. अरगडे यांना शहरातील वीज समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी विविध नागरी समस्यांवर चर्चा करून महावितरणला लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, भूमिगत केबलच्या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, रात्रीच्या वेळी वीज तक्रारी असल्यास तत्काळ सेवा देणारे कर्मचारी नेमावेत, काही भागांत कमी दाबाने होणारा वीजपुरवठा टाळण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत तसेच वीज बिल भरण्यात उशीर झाल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिकांशी अरेरावी करू नयेत अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या.या समस्यांचे निराकरण महिन्याभरात न झाल्यास महावितरणच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांनी दिला.यावेळी उपशहर प्रमुख विशाल पाठारे, विजय आखाडे, शहर समन्वयक नंदू कडू, युवासेना शहराध्यक्ष विवेक भांगरे, महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका अनिता गायकवाड, दिपाली शिरंबेकर, विभागप्रमुख प्रसाद कन्नन, उपविभाग प्रमुख नरेश घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते.



