लोणावळा | प्रतिनिधी
सोमाटणे टोल नाका हा अनधिकृत असून त्याचे त्वरित स्थलांतर अधिकृत जागेवर करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने सिंहगड कॉलेज परिसरातील एमएसआरडीसी व आयआरबीच्या कार्यालयांना भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि लेखी निवेदन सादर केले.
काही दिवसांपूर्वी सोमाटणे टोलनाका अधिकृत आहे की अनधिकृत यासंदर्भात तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये बैठक झाली होती. या बैठकीस एमएसआरडीसी व आयआरबी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाका अधिकृत जागेवर नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र कोणतीही ठोस कारवाई अथवा प्रतिक्रिया अद्याप आलेली नसल्याने आज पुन्हा हा विषय उचलून धरण्यात आला.
मनसेने म्हटले की, सातारा, सांगली, कोल्हापूर, बेंगळुरू आदी भागांतील लाखो वाहनधारक मुंबईकडे जाताना सोमाटणे टोलनाक्यावरून जातात. केवळ उर्से ते सोमाटणे या ३ किलोमीटरच्या अंतरासाठी हे वाहनधारक टोल भरतात. दररोज २५ ते ३० लाख रुपयांचा अनधिकृत महसूल गोळा केला जात आहे. हा पैसा नेमका कुणाच्या खिशात जात आहे, याचा जाब विचारण्यात आला. जर हा टोल त्वरित बंद करण्यात आला नाही, तर मनसे रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
उर्से टोल नाक्याची अडचण
तसेच उर्से टोल नाका जुन्या ठिकाणाहून नवीन जागी स्थलांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना जुन्या टोल स्थानकापर्यंत पोहोचताना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. रात्रीच्या वेळेस या भागात अंधार व असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे जुन्या टोल स्थानकाजवळ बस थांबा, हायमास्ट लाइट आणि २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भांडवलकर, तालुका अध्यक्ष अशोक कुटे, लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले, शहर प्रवक्ते अमित भोसले, सुनील साळवे पैलवान, यश खळदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



