तळेगाव दाभाडे : वारकऱ्यांमध्ये देव, देश, धर्म याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी तसेच नेतृत्वगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने वारकरी नेतृत्व गुण विकास कार्यकर्ता निवासी शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते.
हे शिबिर १९ व २० ऑगस्ट २०२५ रोजी ओम रेस्टॉरंट, वेहेरगाव-दहिवली (ता. मावळ, जि. पुणे) येथे पार पडले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार भसे, सचिव ह.भ.प. रामदास पडवळ, उपाध्यक्ष दिलीप वावरे, कार्याध्यक्ष संतोष कुंभार यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये ध्यानधारणा, प्रार्थना, वारकरी सांप्रदायाचे महत्त्व, संघटन, तसेच देव-देश-धर्म याबाबत अभ्यासू वक्त्यांकडून मौलिक मार्गदर्शन शिबिरार्थींना लाभले. या दोन दिवसीय शिबिरासाठी तालुक्यातील पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख, शहराध्यक्ष, समित्यांचे पदाधिकारी, ग्रामप्रतिनिधी आणि वारकरी बंधुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरासाठी वेहेरगाव-दहिवली येथील वारकरी पाईक ह.भ.प. सुवर्णाताई कुटे यांनी सर्व वारकऱ्यांच्या मोफत निवासाची उत्तम व्यवस्था केली होती.
शिबिराची सुरुवात :
मंगळवारी (दि.१९) सकाळी ९ वाजता श्री पांडुरंगाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाचे बी.के. सुदेशभाई, बी.के. नंदाताई (दीदी) व बी.के. कल्पना (दीदी) यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरार्थींनी ध्यानसाधना केली.
यानंतर ह.भ.प. गोपिचंद महाराज कचरे यांनी वारकरी संघटन व संतांची शिकवण या विषयावर मार्गदर्शन केले, तर आयुर्वेद व भारतीय संस्कृती या विषयाचे अभ्यासक डॉ. सोपान महाराज कृष्णा मिसाळ यांनीही उपयुक्त विचार मांडले. संध्याकाळी शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केले.
दुसरा दिवस :
बुधवारी (दि.२०) प्रार्थना व ध्यानधारणा झाल्यानंतर वारकऱ्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. मनशक्ती केंद्राच्या क्रांतीताई हुक्केरीकर व भानुताई वैद्य यांनी वारकरी संघटन या विषयावर मार्गदर्शन केले. ह.भ.प. गणेश महाराज गोणते यांनी वारकरी सांप्रदायाचे महत्त्व या विषयावर परखड विचार मांडले. डॉ. सोपान महाराज मिसाळ यांनीही मार्गदर्शन केले.
समारोपाच्या सत्रात मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते व वारकरी सांप्रदायाचे पाईक ह.भ.प. भास्करराव आप्पा म्हाळस्कर यांनी वारकरी परंपरा, शिवछत्रपतींचे कार्य व मावळभूमीचे महत्त्व यावर प्रबोधन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. रामदास पडवळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. सागर शेटे यांनी केले.
पसायदानाने शिबिराची सांगता झाली.





