वडगाव मावळ : वडगाव मावळ परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड किरण एकनाथ मोहिते आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे.
दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात किरण मोहिते व त्याच्या साथीदारांनी विवोट्री हॉटेलमध्ये संतोष साळुंखे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादी शाहरुक अत्तार यांच्या तक्रारीवरून सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास वडगाव मावळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्तरित्या केला. आरोपी किरण मोहिते, त्याचे वडील एकनाथ मोहिते, तसेच रविंद्र मोहिते, मयुर उर्फ चण्या मोढवे, करण पवार, सुशांत साबळे यांना अटक करण्यात आली असून सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. एक आरोपी अद्याप फरारी आहे.
किरण मोहिते टोळीवर यापूर्वी खूनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, डॉक्टरांवर हल्ला, पळवून नेऊन खूनाचा प्रयत्न अशा नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यांत आहे. या टोळीची दहशत संपवून परिसरात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मोक्का कायद्यांतर्गत ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
या कामगिरीत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, महिला पोलीस उपनिरीक्षक आर.आर. मोहिते तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष भूमिका बजावली.



