
लोणावळा: माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या या संवाद दौऱ्यामुळे लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या दावेदारीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
या दौऱ्यात भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सुरेखाताई यांनी लोणावळ्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे केली. विकासकामे पूर्ण करण्याची क्षमता, मदतीसाठी तत्परता आणि प्रभावी नेतृत्व या गुणांमुळे त्या नागरिकांमध्ये लोकप्रिय राहिल्या आहेत.
स्वच्छता मोहीम आणि कोविड काळातील कामगिरी
त्यांच्या कार्यकाळात लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग पाच वेळा देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळवले. कचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल घडवून आणत शहराला नवे रूप दिले. तसेच कोविड महामारीच्या काळात केलेल्या कार्यामुळे त्यांचे कौतुक झाले होते.
आगामी निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने, सुरेखाताईंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व मिळाले आहे. समर्थकांनीही याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्याचे दिसते.





