इंदोरी– गणपती उत्सव हा आनंद, श्रद्धा आणि भक्तीचा सण. मात्र विसर्जनानंतर घाटाची झालेली दयनीय अवस्था पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी यायचं. निर्माल्याचे ढीग, नदीकाठी पडून राहिलेल्या मूर्ती, पसरलेली दुर्गंधी – ज्या बाप्पाची आपण भावपूर्वक पूजा केली, त्याच मूर्तींची अशी अवस्था पाहवत नसे. यामुळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यालाही गालबोट लागत असे.
ही वेदना मनाला चटका लावणारी होती. आणि याच वेदनेतून पर्यावरण प्रेमी प्रशांत दादा भागवत व मुकाई मित्र मंडळातील सर्व सहकाऱ्यांनी पंधरा वर्षांपूर्वी समाजहिताची ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली. प्रशांत दादा भागवत हे गेल्या पंधरा वर्षापासून मूकाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असून हे मंडळ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते
दरवर्षी विसर्जन काळात विशेष पथके घाटावर तैनात होतात. भाविकांना विसर्जनापूर्वी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करण्यास प्रोत्साहित केले जाते. या निर्माल्याचे पुढे शेतीसाठी सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले जाते. तसेच विसर्जनानंतर घाटावर व नदीकिनारी एकही मूर्ती टाकून न ठेवता नीट व्यवस्थापन केले जाते . या उपक्रमामुळे आज इंद्रायणी नदी प्रदूषणापासून वाचत आहे. विसर्जन घाट स्वच्छ दिसतो. दुर्गंधी पसरत नाही, रोगराई थांबते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धेने केलेल्या पूजेला गालबोट लागत नाही.
या विषयी बोलताना प्रशांत दादा भागवत म्हणतात :
“बाप्पाची पूजा करून त्याच मूर्तीची दुर्दशा होताना आम्हाला कधीच पाहवत नव्हती. म्हणूनच गेली पंधरा वर्ष आम्ही हे समाजकार्य करत आहोत. ही इंद्रायणी आमची माई आहे, तिची सेवा ही आमची जबाबदारी आहे.”



