इंदोरी, मावळ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमी निमित्त मावळ तालुक्यातील इंदोरी येथे पहिल्यांदाच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रशांत भागवत युवा मंचाच्या पुढाकाराने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास तालुक्यातील विविध भागांमधून हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला. तसेच शाहीर हरिदासजी शिंदे यांचे संबळवादन आणि शिवकालीन गोंधळींचे सादरीकरण यामुळे वातावरण अधिकच दैवी आणि मंत्रमुग्ध झाले.
नऊवारी साड्यांमध्ये सजलेल्या महिला, डोक्यावर गजरे, हातात ओवाळणीची ताटे घेऊन मोठ्या संख्येने देवीसमोर ओवाळणीसाठी उपस्थित झाल्या. एकमेकींच्या कपाळावर कुंकू लावत सौभाग्य, सुख-समृद्धीची प्रार्थना करण्यात आली. “जय भवानी, जय जिजाऊ”, “अंबे मात की जय” अशा घोषणांनी संपूर्ण गाव भक्तिमयतेने दुमदुमून गेले.
गावातील प्रत्येक चौक फुलांनी सजवण्यात आला होता. देवीच्या चरणी नारळ, फुले आणि कुंकू अर्पण करत भक्तिभावाचे दर्शन सर्वत्र घडले.
या सोहळ्यास आमदार सुनील शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, मा. सभापती ज्योती शिंदे, उपसरपंच बेबी बैकर, अनुपमा खांडगे, मेघा भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस प्रशासन आणि हजारो नागरिकांनीही सहभाग नोंदवला.
जगदीश कुलकर्णी महाराज, शाहीर हरिदासजी शिंदे, धनंजय दाभाडे, शशिकांत शिंदे, संकेत शिंदे, रामदास शिंदे, बबन आल्हाट, भरत घोजगे, सुनील वाळुंज, नंदकुमार शेलार, भानुदास दरेकर, सुनील दाभाडे, बाबासाहेब घोजगे, प्रदीप बनसोडे, चंद्रकांत भागवत, संदीप ढोरे, दिनेश चव्हाण, आशिष ढोरे, नितीन ढोरे, अंकुश ढोरे, अनिल राऊत, नंदकुमार भागवत आदी मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक भव्य झाला.
या सोहळ्याबद्दल प्रशांत भागवत म्हणाले – “मावळ तालुक्यातील भगिनींनी उत्स्फूर्ततेने सहभाग घेतल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला. पण खरा आनंद तेव्हा झाला, जेव्हा सर्व महिला सुरक्षितपणे आपल्या घरी परतल्या. देवीची कृपा सर्वांवर राहो आणि मावळ तालुका भक्ती, परंपरा आणि संस्कृतीने समृद्ध होवो, हीच माझी प्रार्थना आहे.”
या उपक्रमामुळे प्रशांत भागवत युवा मंचाने पुन्हा एकदा सामाजिक-सांस्कृतिक चळवळीत आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले. इंदोरी गावाने मावळ तालुक्याच्या सांस्कृतिक नकाशावर नवा ठसा उमटवला आहे.



