खड्डेमय रस्त्याविरोधात तळेगावकरांचे आमरण उपोषण; प्रशांत दादा भागवतांचा जाहीर पाठिंबा

तळेगाव दाभाडे : तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर आज मराठा क्रांती चौकात पीडब्ल्यूडी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण सुरू केले. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरील मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून, अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार तक्रारी करूनही विभागाकडून कोणतीही ठोस दुरुस्तीची उपाययोजना करण्यात आली नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

या आंदोलनाला तळेगाव परिसरातील तसेच इंदोरीसह आसपासच्या गावांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर तळेगावचे लोकप्रिय नेते प्रशांत दादा भागवत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.
“नागरिकांचा आवाज शासनाने ऐकला पाहिजे. विकासकामांच्या नावाखाली जीव धोक्यात येत असतील, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तळेगाव-चाकण महामार्ग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून, या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी व रुग्णवाहिका प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने उपोषणाच्या माध्यमातून लोकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. प्रशांत दादा भागवत यांच्या जाहीर पाठिंब्यामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले असून, शासन-प्रशासनावर दबाव वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें