इंदोरी – प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशन इंदोरी अर्थात संघर्ष क्रीडा मंडळ व प्रगती विद्या मंदिर इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत इंदोरीच्या खेळाडूंनी विजयी झेंडा फडकावला आहे. या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या संघाचे कर्णधार गणेश अशोक दिवटे तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या संघाचे कर्णधार हरिओम विठ्ठल अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे दोन्ही संघांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली असून इंदोरी गावाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.
या विजयी संघांच्या पाठीशी प्रशांत दादा भागवत स्पोर्ट्स फाऊंडेशनचा प्रबळ पाठिंबा आणि प्रेरणा असून, दादांच्या क्रीडाप्रेमी वृत्तीमुळे गावात खेळ संस्कृती अधिक बळकट होत आहे. यावेळी प्रगती विद्या मंदिरचे पर्यवेक्षक काकासाहेब भोरे सर, धनंजय नागरे सर, अरविंद नाईकरे सर, सतीश मिंडे सर व समीर गाडे सर यांची उपस्थिती लाभली. तसेच संघ प्रशिक्षक सुधीर शिवेकर, वसीम तांबोळी, विठ्ठल पवार आणि विशाल चव्हाण यांनी अथक परिश्रम घेत संघांना विजयी घोडदौड करून दिली.
या दुहेरी यशामुळे संपूर्ण इंदोरी गावात आनंदाचे वातावरण असून, प्रशांत दादा भागवत यांच्या क्रीडाप्रोत्साहनाच्या उपक्रमांना या यशामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. सर्व खेळाडूंना व प्रशिक्षकांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा प्रशांत दादा भागवत यांच्या वतीने देण्यात आल्या.



