मावळ तालुक्यातील इंदोरी परिसरात वारकरी संप्रदायाची अखंड भक्ती परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. ‘पायी पालखी सोहळा २०२५’ निमित्ताने बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदोरी बायपास येथील प्रशांत पेट्रोलियम शेजारी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मान्यवर संत आणि कलाकार उपस्थित राहणार असून, भक्ती, ज्ञान आणि संगीताचा संगम घडविणारे कीर्तन, भजन व अभंग गायनाचे सादरीकरण होणार आहे. ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प. ओंकार महाराज जगताप (आळंदी), ह.भ.प. कैलास महाराज पवार (जालना) आणि गायिका शिवानी ताई शिंदे या कलाकारांकडून सादरीकरण होणार असून, तालसाथ मृदंग महामेरू कृष्णा महाराज भोरकडे देणार आहेत.
हा भक्तीमय कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, वारकरी परंपरेचे वैभव साजरे करणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.












