पवनानगर : मावळ तालुक्यातील काले–कुसगाव जिल्हा परिषद गटात नुकत्याच झालेल्या काकडा आरती सोहळ्यानिमित्त ग्रामस्थांशी आपुलकीचा संवाद साधण्यात आला. या दौऱ्यात पंचायत समिती मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी यांनी विविध गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. धार्मिक आणि सामाजिक वातावरणात पार पडलेल्या या भेटींना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कुसगांववाडी येथे झालेल्या आरती व महापूजा कार्यक्रमात श्री. दळवी यांनी ग्रामस्थांची भेट घेतली आणि भजनात सहभाग घेतला. यावेळी ज्ञानेश्वर कडू, गणेश धानिवले, कृष्णा घिसरे, संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला गायकांसह अनेक वारकरी भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
दरम्यान, कै. दिनेश तळेकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन शोक व्यक्त करण्यात आला. तसेच कै. साधू साबळे यांच्या अंत्यविधीसही उपस्थित राहून कुटुंबाला आधार देण्यात आला.
भडवली येथे हभप संदीप महाराज लोहोर यांच्या कीर्तन सोहळ्यास श्री. दळवी उपस्थित राहिले. यावेळी हभप हिरामण घारे, भिकू लोहार, पोलीस पाटील संदीप आडकर, हभप रघुनाथ लोहोर आदींनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.
कोथुर्णे येथे हभप तुषार महाराज दळवी यांच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्यातही ग्रामस्थांनी सहभाग घेतला. त्यानंतर औंढे गावात ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
काले–कुसगाव गटातील विविध गावांना भेट देत झालेल्या या संवाद दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि चर्चेचं वातावरण पाहायला मिळत आहे.












