लोणावळा शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा लोणावळा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन आणि तीन मार्च रोजी दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागामार्फत पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मयुरेश अनंत ढेरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडी आणि वाहन चोरीसह एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून चोरीच्या तब्बल सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात आली असून पोलीस हवालदार मयूर आबनावे, देविदास चाकने, शशिकांत खोपडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल विनायक नेटके आणि राहुल चोरगे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली.











