महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत मावळ तहसील कार्यालयाच्या वतीने समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर मावळ तालुक्यातील खडकाळा, टाकवे बु. आणि वडेश्वर मंडळातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रकरणे आणि अडचणींवर मार्गदर्शन करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात प्रलंबित फेरफार निकाल काढणे, ७/१२ मधील चुका दुरुस्त करणे, ७/१२ व ८अ उतारे वाटप, जमीन वर्ग बदल, अधिवास व रहिवास दाखले, आधारकार्ड कामकाज, तसेच अकृषिक (बिनशेती) प्रकरणांबाबत मार्गदर्शन अशा विविध सेवांचा समावेश आहे.
तसेच पीएम किसान नोंदणी, भू संपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे, निवडणूक विभाग आणि पुरवठा विभागाशी संबंधित कामकाज देखील या शिबिरात करण्यात येणार आहे.
हे समाधान शिबीर शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी श्री साईबाबा सेवाधाम, जुना मुंबई-पुणे हायवे लगत, कार्ले येथे आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या महसुली अडचणींसाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे.











