वसुली दरम्यान महिला वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की,लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

लोणावळा | दि. १६ मार्च २०२६ :
महावितरणच्या वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरण कंपनीकडून पुणे परिमंडलात थकीत वीजबिल वसुली मोहीम सुरू असून सोमवारी (१६ मार्च) दुपारी सुमारे २.१० वाजण्याच्या सुमारास रवी पांगोळी सोसायटी येथे ही घटना घडली. महिला वरिष्ठ तंत्रज्ञ करिश्मा मुकेश पाटील या कंत्राटी कर्मचारी अनिकेत मालपुटे यांच्यासह थकीत वीजबिल वसुलीसाठी तेथे गेल्या होत्या.
शाम रामचंद्र पवार यांच्या नावावरील वीज कनेक्शनचे फेब्रुवारी महिन्याचे ९८० रुपये व मार्च महिन्याचे ९९० रुपये असे एकूण बिल थकीत होते. त्यामुळे करिश्मा पाटील यांच्या सांगण्यावरून अनिकेत मालपुटे कनेक्शन तोडत असताना स्वतःला घराचा मालक सांगणाऱ्या जयनिल दोशी याने त्यांना विरोध केला. त्यानंतर करिश्मा पाटील स्वतः कनेक्शन तोडण्यासाठी पुढे गेल्या असता आरोपी जयनिल दोशी याने त्यांना अटकाव करत मागे ओढून जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे त्या खाली पडल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीने त्यांच्या सहकाऱ्याच्या दुचाकीची चावी काढून घेत त्यांना तेथून जाण्यास मज्जाव करत वाद घातल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी करिश्मा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलिसांनी आरोपी जयनिल दोशी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२१ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शशिकांत खोपडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें