TALEGOAV DABHADE : ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 31वा वर्धापनदिन उत्साहात

तळेगाव दाभाडे : येथील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 31वा वर्धापनदिन रविवारी(दि.5) उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक तथा सहारा वृध्दाश्रमाचे संस्थापक संचालक विजय जगताप, डॉ. शाळीग्राम भंडारी आणि ए.ए. खान उपस्थित होते.

दीपप्रज्ज्वलनानंतर, मंडळाचे अध्यक्ष अशोकराव काळोखे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष स्नेहल रानडे यांनी मंडळाच्या वर्षपूर्ती कार्यअहवाल सादर केला. सामाजिक जीवनातील चांगली कामे करण्यासाठी भल्या माणसांनी केलेली शिफारस आणि त्यातून पुढे उपेक्षितांसाठी मदतीची जोडल्या गेलेल्या माणसांच्या साखळीतून मोठी कामे उभी रहात असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले. राज्यातील 1141 वृध्दाश्रमांपैकी केवळ सहारा वृध्दाश्रम हे विनाशुल्क सेवा देणा-या सातपैकी एक असल्याचे ते म्हणाले.  कुटुंबव्यवस्था आणि वयोवृध्दीतील समस्यांवर जगताप यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. अध्यक्ष अशोकराव काळोखे यांच्या कार्यकाळात मंडळाने केलेल्या विकासकामांबद्दल मान्यवरांनी कौतूक केले. डॉ. भंडारी, ए.ए. खान, देवराईचे सचिव गिरीष खेर यांचीही भाषणे झाली. यावेळी सहारा परिवारासाठी काळोखे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत सुपूर्त केली. डॉ. भंडारी यांनी ग्रंथसंच भेट म्हणून दिला. ज्येष्ठ महिला, पुरुषांच्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना विठ्ठलराव कांबळे पुरस्कृत पारितोषिके पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. मंडळाच्या उपाध्यक्ष आशा जैन, माजी अध्यक्ष सुधाकर रेम्भोटकर आणि सहकार्यांनी नियोजन केले. स्नेहल रानडे यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ उंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें