खोपोली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी आपल्या देशभक्तीपूर्ण गीत आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. खोपोली येथील लायन्स क्लब सभागृहात भरवलेल्या या भव्य कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी उपस्थित राहून दिव्यांग कलाकारांच्या अद्वितीय कलागुणांना मनमोकळी दाद दिली. गणेश वंदनेपासून सुरू झालेला कार्यक्रम “ए मेरे वतन के लोगो” या सुमधुर गीताने संपन्न झाला.
या कार्यक्रमास मा. राजेश खंदारे (प्रथम वर्ग न्यायाधीश, खालापूर), मा. सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, रायगड), मा. विक्रम कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर), दीपेंद्र बदोरिया (अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ खोपोली), आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टच्या श्रीमती पाटणकर यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. खालापूर पोलीस निरीक्षक शितल राऊत, सचिन पवार (खालापूर पोलीस स्टेशन), आणि संजय बांगर (रसायनी पोलीस स्टेशन) यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दृश्यशक्ती ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा गीता पोडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली “हम किसीसे कम नही” या रंगारंग कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली होती. दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या अप्रतिम प्रदर्शनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विक्रम कदम यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी जगदीश मरागजे यांनी सांभाळली.
या कार्यक्रमानंतर रायगड जिल्हा पोलीस दलाने दृश्यशक्ती ट्रस्टला ₹2,25,000 आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टला ₹25,000 देणगी स्वरूपात प्रदान केली. दिव्यांग कलाकारांच्या अप्रतिम कलागुणांमुळे हा कार्यक्रम स्मरणीय ठरला.



