TALEGOAV NEWS : तळेगाव स्टेशन येथील मुस्लिम जमात ट्रस्ट मस्जिदमध्ये रमजान ईदची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मौलाना सिकंदर-ए-आजम यांनी गाव भागातील जमा मस्जिदमध्ये सार्वजनिक दुआ केली.
रमजान ईद साजरी करण्यासाठी स्टेशन मस्जिद येथे नमाज दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिली नमाज सकाळी 8.15 वाजता आणि दुसरी नमाज सकाळी 9 वाजता अदा करण्यात येईल, अशी माहिती मुख्य विश्वस्त अय्युब सिकिलकर यांनी दिली. गर्दीमुळे राहदारीस अडथळा येऊ नये म्हणून नगर परिषद पीएम श्री संत ज्ञानेश्वर शाळेच्या (गुलाबी शाळा) प्रांगणात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांना शिस्तबद्धरित्या रांगेत उभे करण्याचे आवाहन संयोजन समितीप्रमुख नदीम शेख यांनी केले.
गावभागातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, ही नमाज सकाळी 9 वाजता होईल, असे ट्रस्टी रशीद सिकिलकर यांनी सांगितले. रमजान ईद 31 मार्च किंवा 1 एप्रिल रोजी साजरी केली जाईल, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ईदच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे आणि पंचक्रोशीतील मस्जिदी आणि ईदगाहांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि रमजान ईद हे सर्व जातीधर्मीयांनी आपुलकीने आणि एकात्मतेने साजरे करावेत, असे आवाहन ट्रस्ट प्रमुखांनी केले आहे.
गुरुवारी (दि. 27) शब-ए-कद्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर (स. स.) यांच्यावर 1450 वर्षांपूर्वी परमेश्वराची (अल्लाहची) कृपामर्जी झाल्यानंतर पवित्र कुरआन ग्रंथ अवतरला. तमाम मानवजातीला शांतता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मृतींना उजाळा देत तरावीहची नमाज पूर्ण करण्यात आली.



