LONAVALA CRIME : लोणावळ्यातील तुंगार्ली परिसरातील प्रसिद्ध कोहली इस्टेट बंगल्यात अभिनेता अरमान कोहली यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. 25 मार्च 2025 रोजी कोहली यांच्या बेडरूममधील लॉकरमधून 1 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 12 तोळ्यांची सोन्याची चेन चोरीला गेली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अभिनेता अरमान कोहली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरी काम करणारे कामगार आकाश गौड (वय 21) आणि संदीप गौड (वय 23) यांनी चोरी केली असल्याचा संशय आहे. तक्रारीच्या आधारे लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा ठावठिकाणा वसई येथे असल्याचे शोधून काढले. पुणे ग्रामीण पोलिसांनी वसई येथे जाऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींनी चोरीची कबुली दिली असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींना वालीव पोलीस ठाण्यात नोंद करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी त्यांना लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अनिल केरुरकर, पोलीस हवा राहुल पवार, राजू मोमीन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, सागर नामदास, तुषार भोईटे आणि पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.



