लोणावळा शहरातील जयचंद चौक येथे संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवात गवळीवाडा येथील श्रीराम गोविंदा पथकाने सहा थरांचा मानवी मनोरा रचत मध्यरात्री दहीहंडी फोडली. विजेत्या पथकाला तब्बल बारा फूट उंचीची ट्रॉफी, 66 हजार 666 रुपयांचे रोख बक्षीस, बालगोविंदासाठी सायकल व श्रीकृष्णाची मूर्ती देण्यात आली.
दुपारी तृतीयपंथीयांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जातिभेद-लिंगभेद विसरत सामाजिक सलोखा जपण्याचा हा आगळा प्रयत्न ठरला. यावेळी संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद होगले, रणरागिनी महिला ग्रुपच्या मंजुश्री वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई, पुणे, ठाणे तसेच मावळ परिसरातील 14 संघांनी पाच-सहा थरांची सलामी दिली. अंतिम फेरीत 12 संघ सहभागी झाले. ढोल-लेझीम पथकांच्या सादरीकरणाने वातावरण उत्साहपूर्ण झाले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ. पन्नास रुपयांच्या कुपनमधून जमा झालेला निधी स्थानिक अनाथ आश्रम व वृद्धाश्रमांना देण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचे बक्षीस अनिता सैनी यांना मिळाले.
संपूर्ण सोहळ्याला नागरिक व पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्री पावणे बारा वाजता सुरू झालेल्या अंतिम सामन्यानंतर श्रीराम गोविंदा पथकाने हंडी फोडत मानाचा किताब पटकावला. पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवल्यामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला.






