लोणावळा शहरातील महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘लोणावळा वुमेन्स फाउंडेशन’ च्या वतीने महिलांसाठी खास मोफत तीन महिन्यांचा स्पोकन इंग्लिश कोर्स सुरू करण्यात आला आहे. या कोर्सच्या पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
फाउंडेशनकडून साधारण ३० ते ३५ महिला सहभागी होतील असा अंदाज होता, मात्र पहिल्याच दिवशी तब्बल ८१ महिलांनी नोंदणी केली. या अनपेक्षित प्रतिसादामुळे कोर्स दोन बॅचमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रियदर्शनी संकुल येथील वाय. सी. क्लासेसच्या हॉलमध्ये हा कोर्स दररोज संध्याकाळी ५ ते ६ आणि ६ ते ७ या वेळेत होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन फाउंडेशनच्या संस्थापिका बिंदा गणात्रा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आले. यावेळी गणात्रा म्हणाल्या,
“मराठी ही आपली मातृभाषा असली तरी जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी इंग्रजी बोलणे आवश्यक आहे. इंग्रजी न येण्यामुळे अनेक महिलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. या महिलांना तो न्यूनगंड दूर करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा कोर्स हाती घेतला आहे.”



