लोणावळा : लोणावळा नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानले जाणारे नगरसेवक देविदास कडू उर्फ देवाभाऊ यांच्या गणेशोत्सव निमित्त गावभेट व जनसंपर्क दौऱ्यास शहरवासीयांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. “लोणावळ्याचा चेहरा बदलणार, देवाभाऊंचीच साथ हवी!” अशा घोषणा देत अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांना भावी नगराध्यक्ष म्हणून पसंती दर्शवली.
गेल्या दहा दिवसांपासून देवाभाऊंनी शहरातील सर्वच प्रभागात फेरफटका मारत सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या, बाप्पाचे दर्शन घेतले आणि थेट नागरिकांशी संवाद साधला. तरुण कार्यकर्त्यांपासून महिलांपर्यंत व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाने आपापल्या समस्या मांडल्या, तर देवाभाऊंनी “आपल्या सर्व प्रश्नांना ठोस उपाय देईन,” अशी ग्वाही दिली.
भाजप गटनेते आमदार सुनील शेळके यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या देवाभाऊंची प्रतिमा “सर्वांच्या मदतीला तत्पर आणि विकासासाठी कटिबद्ध” अशी आहे. त्यांचा साधा स्वभाव, प्रत्येक संकटात लोकांसोबत खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांचा जनाधार झपाट्याने वाढताना दिसत आहे.
या संवाद दौऱ्यात माजी शहराध्यक्ष दादा धुमाळ, माजी नगरसेविका बिंदा गणात्रा, भाजपा उपाध्यक्ष सुधीर पारिठे, सरपंच सनी कडू, मंदाताई सोनवणे, अविनाश पवार, अश्विनीताई जगदाळे, सुषमा कडू, संदीप गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू झालेला हा जनसंपर्क दौरा येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत असून, लोणावळ्याच्या नागरिकांमध्ये “देवाभाऊच भावी नगराध्यक्ष!” असा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत आहे.



