तहसीलदारांना निवेदन सादर; शेतकरी आणि जनतेसाठी लढा सुरूच राहणार
मावळ तालुका हा मेहनती शेतकरी, कामगार आणि प्रामाणिक जनतेचा तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या या तालुक्यातील जनता अनेक गंभीर समस्यांना सामोरी जात आहे, असे वक्तव्य भाजप सोशल मीडिया मावळ तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
भात पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा रोग पसरला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महिनोनमहिने कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच तालुक्यातील रस्त्यांची बिकट अवस्था पाहून नागरिक त्रस्त आहेत. ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल दाखले न मिळाल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला आणखी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व प्रश्नांबाबत भाजप सोशल मीडिया मावळ तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करून भरपाई द्यावी, रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी तसेच ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल दाखले नागरिकांना सहज उपलब्ध करून द्यावेत, अशा ठोस मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर मोर्चा, धरणे आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी हे निवेदन स्विकारत समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पंचनामे व इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
“मावळ तालुक्यातील शेतकरी आणि जनता एकटी नाही. त्यांच्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीरपणे उभा आहे. ही लढाई न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील,” असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विकास घारे, आंदर मावळ मंडळ अध्यक्ष अभिमन्यूभाऊ शिंदे, युवा नेते संतोष सातकर, संयोजक रवि शिंदे, समिर भोसले, संतोष आसवले, विठ्ठल तुर्डे, करण गोणते, प्रतीक घोडेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



