क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व ॲमेच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धा दि. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान सातारा येथील श्रीमंत शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत लोणावळा येथील व्हि. पी. एस. हायस्कूल व डी. पी. मेहता ज्युनिअर कॉलेज तसेच डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि शिवदुर्ग फिटनेस, नांगरगाव (लोणावळा) येथे सराव करणाऱ्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळवले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. तपस्या अशोक मते हिने ५२ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले, तर कु. प्रीती निवृत्ती दुडे हिने ४७ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळवले. कु. ज्ञानेश्वरी साबळे हिने ६९ किलो वजनगटात चतुर्थ क्रमांक मिळवून कौतुकास्पद कामगिरी केली.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात निशांत कंधारे याने ५९ किलो वजनगटात पाचवा क्रमांक मिळवला, तर जागृत भेसानिया याने ६६ किलो वजनगटात कांस्यपदकाची कमाई केली.
या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरलेला ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र’ हा मानाचा किताब कु. तपस्या अशोक मते हिने पटकावून लोणावळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
खेळाडूंना व्हि. पी. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ. रेवती बोके मॅडम तसेच एशियन चॅम्पियन सौ. ज्योती कंधारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस येथे प्रशिक्षक अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत.
विशेष म्हणजे कु. तपस्या मते व कु. प्रीती दुडे यांची शालेय राष्ट्रीय पावरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपर्क : ९७६२१७०९६८











