मळवली व आसपासच्या गावात 11 तासांपासून वीज पुरवठा खंडित; महावितरण अधिकाऱ्यांचे फोन बंद, नागरिक संतप्त

कार्ला – मावळ तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मळवली व आसपासच्या गावात तब्बल 11 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आज (11 मार्च) सकाळी सुमारे 9 वाजल्यापासून वीज पुरवठा बंद असून रात्री साडेआठ वाजले तरी वीज परत आलेली नाही. त्यामुळे स्थानिक दुकानदार, व्यावसायिक तसेच गृहिणींच्या दैनंदिन कामांवर मोठा परिणाम झाला आहे.
मळवली परिसर हा लोहगड, विसापूर किल्ला आणि भाजे लेणीसारख्या पर्यटनस्थळांमुळे प्रसिद्ध आहे.

मात्र या पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच इतका मोठा वीज खंड झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, महावितरणच्या कार्ला येथील अधिकाऱ्यांकडून वायर जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र ती वायर दुरुस्त करण्यासाठी तब्बल 11 तास लागतात का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याशिवाय महावितरण अधिकाऱ्यांचे फोनही बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार वीज खंडित होणे आणि वेगवेगळ्या दिवशी मेंटेनन्सच्या नावाखाली वीज बंद ठेवणे हे ग्राहकांची पिळवणूक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यह भी पढ़ें